नारायण राणेंना मोठा धक्का; महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे १८ पदाधिकारी शिवसेनेत  

0
521

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे विनायक राऊत रिंगणात आहेत. शिवसेनेने राणेसमोर तगडे आव्हान उभे केले असतानाच राणेंना निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.   

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मोठे खिंडार पडण्यात शिवसेनेला यश आले आहे.  रत्नागिरीत पक्षाला मोठे भगदाड पाडत राणेंच्या पक्षातील १८ पदाधिकारी शिवसेनेने पक्षात घेतले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात राणेंच्या समोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष,  महिला जिल्हाध्यक्षा,  ६ तालुकाध्यक्ष यांच्यासह १८ पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणेंना हा सर्वांत मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला जोरदार फटका बसेल, असे नारायण राणे यांनी  म्हटले होते.  परंतू  मतदानाला दोन दिवस बाकी असताना  स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी  शिवसेनेत प्रवेश करून नारायण राणेंना मोठा दणका दिला आहे.