नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाला खिंडार; पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

0
2426

सिंधूदुर्ग, दि. २३ (पीसीबी) – स्वाभिमान पक्षाचे प्रमुख व खासदार नारायण राणे यांचे पूत्र माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून मिळणाऱ्या  वागणुकीला  वैतागून सिंधुदुर्गातील ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’च्या काही पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी  राजीनामे  दिले आहेत.  त्यामुळे  लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर   पक्षाला मोठे खिंडार पडले असून  पक्षाला फटका बसण्याची शक्यता  व्यक्त केली जात आहे.

कोकणात निलेश राणे पक्षाच्या कार्यकर्त्यांना हीन दर्जाची वागणूक देत आहेत. त्यामुळेच कार्यकर्ते   दुखावले गेले आहेत. नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल, तर पदावर राहणे काय कामाचे? अशी भावना   कार्यकर्ते खासगीमध्ये व्यक्त करत आहेत.  निलेश राणे यांनी नुकतीच कुडाळ महाराष्ट्र स्वाभिमान कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी  कार्यकर्त्यांना खडसावल्याचे समजते.  त्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी   तडकाफडकी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्याकडे  दिले.

पक्षांतर्गत  गटबाजीमुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी  राजेनामे दिल्याचे  बोलले जात आहे.  तर दुसरीकडे कार्यबाहुल्यामुळे आम्हाला पक्ष संघटनेला वेळ देता येत नाही, अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. स्वतःची पदरमोड करुन काम करतो, मात्र आम्हाला  अपमानास्पद वागणूक मिळत असेल, तर पदावर राहणे काय कामाचे? अशी भावना  व्यक्त केली जात आहे.  त्यामुळेच सर्वांनी सामूहिक राजीनामे देण्याचा  निर्णय घेतला.