Maharashtra

नारायण राणेंचा पक्ष लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार; पुत्र निलेश राणेला सिंधुदूर्ग-रत्निगिरीची उमेदवारी

By PCB Author

February 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केली आहे. तसेच आपले पुत्र माजी खासदार निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदासंघातून स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असेही त्यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मुंबईतील रंगशारदामध्ये मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. आघाडी किंवा युतीत जाणार नाही, असे नारायण राणे यांनी मेळाव्यात स्पष्ट केले. तसेच युतीत माझ्या नावाची काही जणांना कावीळ झाली असल्याचे ते म्हणाले.

आपले पुत्र माजी खासदार निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर बोलताना नारायण राणे यांनी दहशतवादी हल्ल्यानंतर गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीवरही टिका केली. जवान शहीद झाल्यानंतर देश स्तब्ध झाला असताना सत्ता आणि स्वार्थाच्या तडजोडीसाठी युतीच्या बैठका सुरू होत्या, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात आघाड्या आणि युत्या होत आहेत. त्याचे कारण यांच्याकडे लोकसभा आणि विधानसभेसाठी उमेदवार नसल्याची टिकाही त्यांनी केली.