Pimpri

नारायण बारणे यांच्यासह वाकड व थेरगाव भागातुन अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश – नामदेव ढाके

By PCB Author

December 03, 2021

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यासाठी शहरातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इच्छुक आहेत. भाजपाच्या नगरसेविका मायाताई बारणे यांचे पती माजी नगरसेवक संतोष बारणे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. आज त्यांचे बंधु नारायण बारणे व पुतणे रोहीत बारणे तसेच वाकड मधील युवा कार्यकर्ते विक्रम कलाटे व अभिजीत गायकवाड यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह हॉटेल सदानंद रिजेन्सी, बालेवाडी येथे राज्याचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी पिंपरी विधानसभेचे प्रभारी सदाशिव खाडे, नगरसेवक विलास मडिगेरी, भाजपाचे प्रदेश चिटणीस अमित गोरखे, गणेश गुजर आदी उपस्थित होते. या प्रवेशासाठी चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे व विशालअप्पा कलाटे यांनी पुढाकार घेतला.

महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये होत आहे. त्यानुषंगाने त्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये झालेला प्रवेश वाकड आणि थेरगाव भागात भाजपासाठी फायदेशीर ठरणारा आहे. याशिवाय येणाऱ्या काळात अजुनही बरेच कार्यकर्ते व काही विद्यमान नगरसेवक भाजपामध्ये प्रवेशासाठी संपर्कात आहेत. यांचा सुध्दा भाजपामध्ये योग्य वेळ पाहुन प्रवेश होणार आहेच त्यामुळे “आगे आगे देखो, होता है क्या” असेही या प्रवेशावर सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले.