Entertainment

नाना पाटेकर यांच्याकडून गैरवर्तन; तनुश्री दत्ताचा गौप्यस्फोट

By PCB Author

September 26, 2018

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगताना तनुश्री हिने हा गौप्यस्फोट केला आहे.

‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटासाठी एका स्पेशल गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी नाना पाटेकर चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. चित्रीकरणाच्या करारानुसार ते गाणे खरेतर केवळ माझ्या एकटीवर चित्रीत होणे अपेक्षित होते. मी हा प्रकार दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगितला, पण त्यांनीही मला नाना पाटेकर सांगितले तसे करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक खुलासा तनुश्री हिने एका मुलाखतीत केला आहे.

बॉलिवूडमधील अनेकांना नाना पाटेकर महिला कलाकारांशी असभ्य वर्तन करतात हे माहित आहे. याशिवाय त्यांनी महिला कलाकारांना सेटवर मारहाण केल्याचेही प्रकरण घडले आहे. पण यावर बोलायची कुणाची हिंमत होत नाही, असेही तनुश्री म्हणाली. इतकेच नाही तर नाना पाटेकर यांनी गुंडांकरवी मला आणि माझ्या कुटुंबियांना धमकावल्याचेही तनुश्रीने सांगितले आहे.