नाना पाटेकर महिलांसोबत गैरवर्तन करणार नाही; राज ठाकरेंनी केली पाठराखण

875

अमरावती, दि. १८ (पीसीबी) – अभिनेता नाना पाटेकर कितीही खराब असो, मात्र, महिलेसोबत गैरवर्तन करणार नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नानांची पाठराखण केली आहे. ते विदर्भ दौऱ्यावर  असून अमरावतीत बोलत  होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच सध्या देशभर गाजत असलेल्या मी टू मोहिमेवर प्रतिक्रिया दिली.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. दहा वर्षापूर्वी नानाने गैरवर्तन केल्याचे तनुश्रीने म्हटले आहे. त्यानंतर देशभरात विविध क्षेत्रात मी टूचे वादळ घोघावू लागले आहे.

अमरावती येथे अंबा फेस्टिव्हल  आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरे  मुलाखतीदरम्यान   बोलत होते. यावेळी राज म्हणाले की, नाना पाटेकर कितीही खराब असो, पण अशी कामे तो कधीच करणार नाही. हे मी टू पेट्रोल-डिझेल दरवाढ प्रकरण वळविण्यासाठी तर नाही ना? कारण सध्या जे बसले ते काहीही करु शकतात, असेही ते म्हणाले.

ट्विटरवर मी टू-मी टू करण्यापेक्षा जेव्हा तुमच्यावर असा प्रकार होतो, तेव्हाच का नाही आवाज उठवला जात? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मी तर माझ्या सर्व आया-बहिणींना आवाहन करतो की, असा प्रकार झाला की मला फोन करा, मी बघतो काय करायचे,  असे राज ठाकरे  म्हणाले.