नाना पाटेकर नाही तर मोहन जोशी साकारणार रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’!

0
630

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – “कुणी घर देता का घर”? अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणाऱ्या, आपलं हरवलेलं वैभव शोधणाऱ्या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’. विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या विविध शोकांतिकांवरून प्रेरित होऊन अशीच एक शोकांतिका मराठीत नाट्यरूपात लिहिली वि. वा. शिरवाडकर यांनी. सत्तरच्या दशकात हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचत अभिनयाचा एक मोठा मापदंड निर्माण केला. प्रत्येक मराठी रसिकाच्या मनावर या नाटकाचं गारूड आजही कायम आहे. हेच नाटक रूपेरी पडद्यावर भव्य रूपात प्रेक्षकांसमोर आणलं ‘नटसम्राट’ या चित्रपटाच्या माध्यमातून. अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली.  

प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारं हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. मात्र यावेळी रंगभूमीवर मोहन जोशी ‘नटसम्राट’चं आव्हान पेलणार आहेत. या नाटकातल्या गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेची भुरळ मोठमोठ्या नटांना पडली. आजवर यशवंत दत्त, सतीश दुभाषी, दत्ता भट, श्रीराम लागू, उपेंद्र दाते यांनी गणपतराव साकारले आहेत. हॅम्लेट, अलबत्या गलबत्या या नाटकांच्या यशानंतर झी मराठी ‘नटसम्राट’ हे नाटक मंचावर आणत आहे. या नाटकात गणपतरावांची भूमिका मोहन जोशी तर कावेरीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी असतील. बऱ्याच वर्षांनी हे दोघं रंगभूमीवर आले असून ऋषीकेश जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत.

मोहन जोशी या भूमिकेला न्याय देतील असा विश्वास रंगकर्मींना आहे. नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली असून ४ नोव्हेंबर रोजी हे नाटक रंगभूमीवर आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.