नाना पटोले होणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

0
360

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार करोनाविरोधात संघर्ष करत असताना, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले मात्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासंदर्भात पक्षाश्रेष्ठींकडे बाजू मांडण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर आले आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली व ती गेले सहा महिने समर्थपणे सांभाळत आहे. पक्षाने दुसरी कुठलीही जबाबदारी दिली तर तीही मी स्वीकारण्यास तयार आहे, असे भाजपमधून काँग्रेसवासी झालेले नाना पटोले यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचा पुनरुच्चारही पटोले यांनी केला.

करोनाच्या आपत्तीनंतर रेल्वे व विमानसेवा बंद असल्यामुळे कोणताही राजकीय नेता दिल्लीत आलेला नाही. दोन महिन्याच्या कालावधीनंतर महाराष्ट्र सदनात आलेले नाना पटोले हे पहिले राजकीय नेते आहेत. पटोले बुधवारपासून दिल्लीत असले तरी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी वा राहुल गांधी यांची भेट झालेली नाही. सोनिया व राहुल यांच्या काही निष्ठावान काँग्रेस नेत्यांची त्यांनी भेट घेतली असून प्रदेश काँग्रेसच्या संघटनात्मक बदलाचा मुद्दा कानावर घातला आहे.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे महसूल खात्याचे मंत्रिपद, विधिमंडळ पक्षाचे नेतेपद आणि प्रदेशाध्यक्ष पद अशी तिहेरी जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करून नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याची वर्णी लावण्याची चर्चा होत असली तरी, दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर याबाबत कोणताही विचार झालेला नसल्याचे समजते.

पटोले यांनी बुधवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली. मात्र, अधिवेशनाचे आयोजन कसे करायचे याबाबत निर्णय झालेला नाही. ९ जून रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात या मुद्दय़ाचा विचार होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशन पूर्ण कालावधीसाठी घेता येणे शक्य नसल्याने प्रत्येकी दोन दिवस विधानसभा व नंतर विधान परिषदेचे कामकाज घेता येईल का, या पर्यायावर बैठकीत चर्चा होऊ शकते.