नाणार रायगडमध्ये स्थलांतरित होणार; मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर

0
481

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर देत ही माहिती दिली आहे. सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा हा सुमारे तीन लाख कोटींचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्य़ात राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता. परंतु शिवसेनेने नाणारला विरोध केला. तसेच भाजपबरोबर युती करताना हा प्रकल्प रद्द करण्याची अट घातली होती.

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून यावेळी विधानसभेत लेखी उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याची माहिती दिली आहे. तसंच प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास स्थानिकांचा विरोध नसल्याचेही मुख्यंत्र्यांनी म्हटले आहे. ४० गावातील ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध नाही असेही त्यांनी सांगितले आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होता. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, निसर्गाची हानी होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. शिवसेनेनेदेखील कोकणातील जनतेच्या बाजूने भूमिका घेत या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केला होता. कोकणातील भाजपाचे नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. त्यावरुन शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘जठाराग्नी’ शांत करण्याचा सल्ला दिला होता. नाणार प्रकल्प झालाच पाहिजे हे ठणकावून सांगणे हा नीचपणा जितका तितकाच निर्घृणपणा आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.