नाणार प्रकल्प लादणार नाही – मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस

0
418

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – नाणारचा प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण पूरक असला तरी स्थानिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प लादणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नाणारच्या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला आहे, नारायण राणेंनी हा प्रकल्प केल्यास राजीनाम्याचा इशारा दिला आहे तसेच स्थानिकांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र आत्तापर्यंत राज्य व केंद्र सरकारची भूमिका हा प्रकल्प होणारच अशी होती. त्यादृष्टीने विविध विदेशी सरकारांशी व कंपन्यांशीही करारही करण्यात आले होते. मात्र, विधीमंडळास संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी आज पहिल्यांदाच मवाळ भूमिका घेतली असून विरोध कायम राहिला तर नाणार प्रकल्प लादणार नाही अशी भूमिका मांडली आहे.

या रिफायनरीसाठी तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून ही देशभरातली कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पातली सर्वाधिक गुंतवणूक असल्याचा दाखला फडणवीसांनी दिला. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आणि अनेक लोकांशी चर्चा करुन नाणार व लगतच्या भागात जागा संपादन करुन रिफायनरी करण्याचा प्रस्ताव मांडला असे ते म्हणाले. आता मुख्यमंत्र्यांनीही हा प्रकल्प लादणार नाही, जबरदस्तीने जमीन अधिग्रहण करणार नाही अशी भूमिका मांडल्याने या प्रकल्पाचे काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.