Maharashtra

नाणार प्रकल्पावरून विधानसभेत गोंधळ; प्रताप सरनाईक, नितेश राणेंनी राजदंड पळवला

By PCB Author

July 11, 2018

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – नाणार प्रकल्पाच्या विरोधात आज विधानसभेत विरोधी पक्षासह शिवसेनेने गोंधळ घातला. या गोंधळातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी राजदंड पळवला. गोंधळामुळे कामकाज करणे शक्य नसल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. नाणार प्रकल्पाविरोधात नाणारवासीय आज नागपुरात आले आहेत. विधान भवनाबाहेर त्यांचे आंदोलन सुरू आहे. ही माहिती देण्यासाठी राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाँईट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत बोलण्याची परवानगी मागितली होती. परंतु, विधानसभाध्यक्षांनी ती फेटाळल्याने शिवसेना आक्रमक झाली. यावेळी आमदार नितेश राणे हे देखील आक्रमक झाले होते. प्रताप सरनाईक आणि नितेश राणे यांनी याप्रकरणी निषेध व्यक्त करत विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवला. शिवसेनेने आपल्या कृत्याचे समर्थन केले आहे. प्रत्येक सदस्याला पाँईंट ऑफ इन्फर्मेशननुसार बोलण्याचा अधिकार आहे. परंतु, अध्यक्षांनी तो नाकारला. त्यांनी बोलायला परवानगी द्यायला हवी होती. नाणार कोकणाचा विनाशा करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात शिवसेना नेहमी आक्रमक राहील, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.