नाठाळ बैलांना आठवडी बाजार दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही- शरद पवार

0
311

जालना, दि. २१ (पीसीबी)- पळून जाताना लाज वाटली पाहिजे, पंधरा वर्षे मंत्री होते तेंव्हा काय केले, पळाटीतले काय तण उपटले काय, आता विकास करण्यासाठी तिकडे जातोय असे म्हणता, लाज वाटली पाहिजे. काही चिंता, काळजी करू नका राजकारणात अशा खोड्या करणाऱ्या या सगळ्या नाठाळ बैलांना आठवडी बाजार दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, या शब्दांत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांची जालन्यात शुक्रवारी खरडपट्टी काढली.

मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री केले असे दोन लोक तिकडे गेले, असा उल्लेख करून ते म्हणाले, ‘ज्यांना पक्षाने मोठ केले. शक्ती दिली ज्या पक्षनेत्वृत्वाने संधी दिली आणि एकदा काय उन्हाळा पावसाळा आला तर राहवत नाही म्हणून पळून गेले, काही चिंता करू नका, तुम्ही आणि मी असल्यावर जास्त दिवस नाही महिना सव्वा महिना आहे. एकदा तिकडे बटन दाबायची संधी आली की यांचा विकास कुठे पाठवायचा त्याचा निकाल आपण घेऊ.’

अनेक ठिकाणी लोकांची पळापळ झाली पण अंकुशराव टोपे यांनी या जिल्ह्यात ज्या पद्धतीच्या विचाराचे रोपटे लावले त्या विचाराने सहकारी वाढले आहेत. सगळीकडे पळापळ झाली पण या जिल्ह्यातील एकही माणूस हलला नाही. त्याचे कारण शब्दाला जाण्याची किंमत, महत्त्व आहे. दुष्काळाचे, पाणी टंचाईचे कोणतेही संकट असो आपल्या या जिल्ह्य़ाचा अभिमान वाटतो, असे पवार म्हणाले.

अनेक लोक म्हणतात कोणी इकडे गेले कोण तिकडे गेले, आपण नैतिकता आणि नीत्तीमत्तेच्या आधारावर जीवन जगत आलेलो आहे. अंकुशराव टोपे यांनी तेच जीवन जगले, त्या नैतिकतेला तडा जाऊ देणार नाही, असे यावेळी राजेश टोपे म्हणाले. भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे भाषण झाले. माजी खासदार पुंडलिकराव दानवे, माजी आमदार अरविंद चव्हाण, बबलू चौधरी यांच्रूासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.