नाटकांचे आता ऑनलाईन प्रयोग; बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत रंगकर्मी सज्ज

0
213

पुणे, दि. ७ (पीसीबी) : करोना संकटामुळे नाटय़गृहे बंद असताना नाटकवेडय़ा मराठी रसिकांसाठी आता नाटकांचे ऑनलाइन प्रयोग ही नवी संकल्पना रूजू पाहत आहे. रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत रंगकर्मी सज्ज झाले आहेत. टाळेबंदीच्या काळात नाटकाला लागलेले कुलूप आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उघडण्याचा कलाकारांचा प्रयत्न आहे.

नाटकघर संस्थेतर्फे ‘परवा आमचा पोपट वारला’ या डॉ. चंद्रशेखर फणसळकरलिखित नाटकाच्या अभिवाचनाचा ऑनलाइन प्रयोग अतुल पेठे यांनी नुकताच सादर केला. तर, प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक ॠषिकेश जोशी मराठीतील नेटक म्हणजेच इंटरनेटवरील नाटकाचा प्रयोग घेऊन रविवारी (१२ जुलै) रसिकांच्या भेटीस येत आहेत. प्रेक्षकांना नाटक पाहायचे आहे. पण, करोना संकटामुळे नाटय़गृहे बंद असताना नाटकच थेट त्यांच्या घरी पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे पेठे आणि जोशी यांनी सांगितले.

पेठे म्हणाले, ‘परवा आमचा पोपट वारला’ या रीतसर तिकीट लावून सादर केलेल्या ऑनलाइन नाटय़ अभिवाचनाच्या प्रयोगाला ६० जणांनी तिकिटे घेतली होती. त्यापैकी चारजण लंडन आणि अ‍ॅमस्टरडॅम येथून सहभागी झाले होते. जयेश आपटे, आलोक ताम्हणकर, आदित्य रहाणे, अमेय वर्तक, कस्तुरी सुटावणे-कुलकर्णी आणि शुभम जोशी या मित्रांनी प्रयोगाची तांत्रिक जबाबदारी घेतली. नाटकघर, रावी मोशन पिर्स आणि वायर्ड एक्सप्रेशन या तीन संस्थांनी एकत्र येऊन हा प्रयोग केला. प्रयोगाच्या आधी ऑनलाइन तालीम केली. माझ्या घरात प्रयोगाला अनुकूल जागा तयार करून रंगमंच व्यवस्था केली. आवाजाची चाचणी घेतली. मी तीन घंटा दिल्यावर प्रयोग सुरू झाला. मोबाइलच्या अंदाजाने आणि कानात खुपसलेल्या हेडफोनवर अंदाज घेत प्रयोग केला.

ही करोना भानगड दिवसेंदिवस अनिश्चित होत जात असताना काही करून पाहण्याची प्रामाणिक खटपट यशस्वी झाल्यामुळे मजा आली. मनावरचे मळभ थोडे दूर झाले. शिवाय नाटक पाहायला लोक उत्सुक आहेत हा धीर मिळाला, असे पेठे यांनी सांगितले.

‘मोगरा’चा रविवारी प्रयोग
ॠषिकेश जोशी दिग्दर्शित ‘मोगरा’ या इंटरनेटवरील नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवारी सादर होणार आहे. तेजस रानडे लिखित नाटकामध्ये वंदना गुप्ते, भार्गवी चिरमुले आणि स्पृहा जोशी यांच्यासह पाच कलाकारांचा समावेश आहे. टाळेबंदीच्या काळात घरबसल्या प्रेक्षकांना नाटकाचा आनंद देण्याच्या उद्देशातून नेटकची निर्मिती केली असल्याचे ॠषिकेश जोशी यांनी सांगितले. नाटकाच्या प्रयोगाचे कॅमेऱ्यावर चित्रीकरण करून तांत्रिकदृष्टय़ा प्रेक्षकांपर्यंत विनासायास पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मराठीमध्ये प्रथमच होत असलेल्या या वेगळ्या प्रयोगाच्या पाठीशी मायबाप प्रेक्षक खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.