नागरिकांनी महापालिकेकडून मिळालेली घरे विकू नये – महापौर माई ढोरे

0
255

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्टीवासीयांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. या घराचा योग्य प्रकारे वापर करून आपले राहणीमान उंचवावे. आणि दिलेली सदनिका स्वच्छ व सुंदर ठेवावी ती विकू नये, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड -लिंकरोड येथील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसन प्रकल्पातील सदनिकांची संगणकीय सोडत आज चिंचवड येथे झाली. झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागात त्यांच्या हस्ते घेण्यात आली.

नगरसेविका जयश्री गावडे, नगरसेवक शितल शिंदे, शैलेश मोरे, माजी नगरसेवक जगन्नाथ साबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, सामाजिक कार्यकर्ते दीपक मेवानी, प्रताप खैरारीया, सुंदर कांबळे आदी उपस्थित होते. या प्रकल्पात 5 इमारती उभारण्यात आलेल्या आहे. त्यापैकी 2 इमारतीसाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांची संगणकीय सोडत काढण्यात आली. एका इमारतीमध्ये 112 सदनिका असून एका सदनिकेचे क्षेत्रफळ 269 चौरस फुट इतके आहे. त्यापैकी एक सदनिका अंगणवाडीकरिता राखीव ठेवण्यात आली आहे.

तसेच दिव्यांगासाठी शासकीय नियमानुसार आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. यासाठी लाभार्थ्याकडून स्वत:चा हिस्सा 42 हजार 570 रुपये मागासवर्गीयांसाठी व 50 हजार 575 खुला वर्गासाठी असून ज्यांची नावे पात्र लाभार्थ्यांमध्ये आहेत. त्यांच्याकडून हा स्व:हिस्सा भरून घेऊन त्यांना सदनिकेचे वाटप करण्यात आले आहे.