नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांची ‘फोन अ फ्रेंड’ आणि ‘पोलीस आपल्या दारी’ संकल्पना

0
668

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास वाढावा आणि शहर परिसरातील गुन्हेगारीवर जल्द गतीने आळा बसावा यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून ‘फोन अ फ्रेंड’ आणि ‘पोलीस आपल्या दारी’या दोन संकल्पना राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, ‘फोन अ फ्रेंड’ या संकल्पनेमुळे पोलिस आणि शहरातील नागरिकांमध्ये कायम सुसंवाद राहिल. या संकल्पनेमुळे आता शहरात कोठेही गुन्हेगारी घटना घडल्यास नागरिक त्याबाबतची तक्रार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडील (०२०-२७४५०८८८ / ०२०-२७४५०६६६) या संपर्क क्रमांकावर करु शकतील, नियंत्रण कक्षातून संबंधित पोलीस ठाण्याच्या पथकाला याबाबत माहिती देऊन घटनास्थळी तातडीने पाठविण्यात येईल. एका पथकात सात पोलिस असतील. यामुळे जलद गतीने गुन्हेगारांवर कारवाई होऊन गुन्हेगारीवर आळा बसेल. तसेच घटनेची तीव्रता लक्षात घेत पथकांची संख्या वाढेल. काही ठिकाणी आयुक्तालयाचे देखील पथक घटनास्थळी जाऊन कारवाई करणार आहेत.

‘पोलीस आपल्या दारी’ या संकल्पनेची माहिती देताना आयुक्त म्हणाले, “नागरिकांच्या तक्रारी आणि वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईसाठी ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. मोठ्या वसाहती, पोलीस चौकी आणि अन्य म्हत्वाच्या ठिकाणी तक्रार पेटी बसवण्यात येणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरूपात टाकाव्यात. त्या तक्रारी ठराविक दिवशी वाचून पोलीस त्याबाबत त्वरित कारवाई करतील. वाहतूक विभागाकडून करण्यात येणाऱ्या कारवाया आणि त्यांचे दंड वसूल करण्यासाठी देखील या संकल्पनेचा उपयोग होणार आहे. एखाद्या वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याबाबत वाहतूक विभाग पुरावे जमा करून थेट वाहन मालकाच्या घरी जाऊन दंडात्मक कारवाई करतील. ही योजना पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी यावेळी दिली.

शहरात भाड्याने राहणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पेइंग गेस्टची संकल्पना देखील शहरात मोठ्या प्रमाणात रूढ होत आहे. नोकरी करणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या महिला व मुली महिला वसतिगृहात राहतात. अशा भाडेकरू, पेइंग गेस्ट आणि महिला वसतीगृहाचा पोलिसांकडून आढावा घेतला जाणार आहे. नोकरी करणाऱ्या, शिक्षण घेणाऱ्या मुलींवर येणाऱ्या अडचणी  पोलिस समजून घेऊन महिलांची मदत केली जाणार असल्याची माहिती पद्मनाभन यांनी दिली.