नागरिकांची भ्रष्ट सत्तेतून सुटका करायची आहे, त्यासाठी तयारीला लागा – शरद पवार यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन

0
409

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवडच्या नागरिकांची भ्रष्ट सत्तेतून सुटका करायची आहे, त्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले. माजी नगरसेवकांच्या मोळाव्यात ते बोलत होते. गेल्यावेळी आपण गाफिल राहिल्याने सत्ता गेली, आता ती चूक दुरुस्ती करायची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
भाजपाच्या दोन नेत्यांनी शहराची दोन भागांत वाटणी केल्याचे सांगताना पूर्वीचे संदर्भ देत आता या शहराचे चित्र घसरले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, महापालिकेतील विरोधीनोते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल यांच्यासह १४० माजी नगरसेवक उपस्थित होते.

शरद पवार यांनी आपल्या भाषणात महापालिकेतील सत्ताधीर भाजपावर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, मला एका अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळी विकासाच्या मुद्यावर नगरसेवक आमच्यावर दबाव आणायचे. आता या शहराचे दोन भाग केले आहेत. इकडे यांचे राज्य आणि तिकडे त्यांचे राज्य असते, असे सांगताना दुकानदारी अशा शब्दांत पवार यांनी भाजपा आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचे नाव न घेता संभावना केली.

गेल्या निवडणुकित आपण गाफिल राहिल्याने सत्ता गेली, अशी खंत व्यक्त करून आता ती चूक दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. हे शहर काही एक- दोन लोकांच्या हातात गेल्याने इथली सत्ता भ्रष्ट झाली. आता नागरिकांची या भ्रष्ट सत्तेतून मुक्तता करायची आहे, सुटका करायची आहे. सत्ता अधिक लोकांच्या हाता दिली पाहिजे म्हणून आपण काही निर्णय घेतले आहेत.

माजी नगरसेवकांना संबोधित करताना पवार म्हणाले, ज्या समाजाशी तुमची बांधीलकी आहे त्यांना विसरू नका. राष्ट्रवादी हे एक कुटुंब आहे. कुटुंबात नव्या सुना येतील, सासू सासरेही असतात. नवीन सुनेच्या कामाचे कौतुक करायला सासूने शिकले पाहिजे. पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे पाहून पवार यांनी त्यांनासुध्दा सल्ला दिला आणि १४० माजी नगरसेवकांना कायम सन्मानाची वागणूक द्या, सुसंवाद ठेवा असे सांगितले.