नागपूर पोलिसांनी राज्यातील पहिली डिजिटल चार्जशिट न्यायालयात केली दाखल

0
703

नागपूर, दि. ७ (पीसीबी) – एका खून प्रकरणातील ‘डिजिटल चार्जशिट’ न्यायालयात दाखल कण्यामध्ये नागपूर पोलीस प्रथम ठरले आहेत. नागपूर पोलिसांनी  राज्यातील पहिली ‘डिजिटल चार्जशिट’ न्यायालयात दाखल केली आहे.

यशोधरानगर पोलिसांना हा मान मिळाला असून, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी यशोधरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांचे अभिनंदन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गांजाची पाकिटे चोरी केल्याच्या संशयावरून शेरु अली मेहबूब अली या इसमाची (दि. ९ मार्च) रात्री बाराच्या सुमारास एकता कॉलनीत हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, उपनिरीक्षक रंदई, शिपाई लक्ष्मीकांत, मंगेश देशमुख, राजेंद्र चौगुले, किशोर बिवे यांनी तपास करून गोलू ऊर्फ कुणाल विद्याधर कांबळे, राहुल भीमराव इंगळे व कुणाल नरेंद्र वाघमारे या तिघांना अटक केली.

पोलिसांनी सुरुवातीपासून प्रथम खबरी अहवाल,घटनास्थळ पंचनामा, आरोपींचा कबुलीजबाब, जप्ती पंचनामा, साक्षीदारांचे बयाण आदींसह संपूर्ण तपासाचे चित्रीकरण केले, संपूर्ण गुन्ह्याचे कागदपत्र व दोषारोपपत्राच्या चित्रीकरणासह’ डिजिटल चार्जशिट’ मंगळवारी (दि.५) न्यायालयात दाखल केली. यामुळे नागपूर पोलीस राज्यातील पहिली ‘डिजिटल चार्जशिट’ न्यायालयात दाखल करण्यामध्ये प्रथम ठरले आहेत.