नागपूर कारागृहाला कोरोनाचा विळखा

0
289

नागपूर, दि. ३ (पीसीबी) : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गापासून अलिप्त राहिलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातही आता कोरोनाने प्रवेश केला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाऱ्यासह 10 कारागृह कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यात वाढ व्हायला सुरुवात झाली आणि आता जेलमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 96 वर पोहचला आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

तुरुंगात कोरोनाचा प्रवेश होऊ नये, म्हणून नागपूर मध्यवर्ती तुरुंग लॉकडाऊन करण्यात आलं होतं. याशिवाय, नवे नियम तयार करुन ते राबवण्यात आले. या नव्या नियमानुसार, नव्या कैद्यांना 14 दिवस तुरुंगाबाहेर तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या तुरुंगात ठेवण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. सोबतच बंदोबस्तासाठी तुरुंगात कर्मचारी आणि अधिकारी यांना दोन आठवडे तुरुंगाच्या आत राहण्याचे निर्देश देण्यात आले.

या धोरणानुसार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक बॅच 26 जूनला तुरुंगातून बाहेर आली. तुरुंगाच्या आत असलेल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना सदृश लक्षणे दिसू लागली होती. बंदोबस्त आटोपून बाहेर आलेल्या या कर्मचाऱ्याने घरीच उपचार केले. परंतु, आराम नसल्याने अखेर त्याने शासकीय मेडिकल रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 30 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 9 कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यात एका अधिकाऱ्याचाही समावेश होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 44 पॉझिटिव्ह आले आणि आज 30 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. असे 96 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यात कैदी, कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नातेवाईक यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.