नागपुरात संपत्तीसाठी दत्तक मुलीने केली वृध्द आई-वडलांची हत्या

0
610

नागपुरा, दि. १६ (पीसीबी) – संपत्तीसाठी प्रियकराच्या मदतीने दत्तक मुलीने वृध्द आई-वडलांची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नागपुरातील वाडी परिसरातील सुरक्षानगरमध्ये घडली.

शंकर चंपाती (वय ७३) आणि सीमा चंपाती (वय ६५) असे हत्या झालेल्या आई-वडिलांची नावे आहेत. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दत्तक मुलगी प्रियांका (वय २५) आणि तिचा बॉयफ्रेंड इकलाख खान (वय २६) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरक्षानगर येथे चंपाती हे राहतात. त्यांचा दत्तवाडी चौकात नारळपाणी विक्रीचा व्यवसाय असून त्यांची पत्नी सीमा गृहिणी आहे. त्यांची मुलगी प्रियंका चंपाती ही खासगी नोकरी करते. प्रियंका रविवारी रात्री आठ वाजता बाहेरुन घरी आली. तेव्हा आई सीमा तर वडिल शंकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे तिला आढळून आले.

चंपाती दाम्पत्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे दिसून येत होते. घरफोडी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी हा हल्ला केला असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. काही दिवसांपूर्वी शंकर यांचा अपघात झाल्याने ते जखमी झाले होते. त्यामुळे ते घरीच राहायचे. त्यावेळी एकाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची तक्रार वाडी पोलीस ठाण्यात दिली होती. प्रियंका हिच्याकडे चौकशी करीत असताना तिच्या सांगण्यात विसंगती आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्यांनी तिच्याकडे आणखी सखोल चौकशी केली. त्यात तिला हत्या झाली तेव्हा ती कोठे होती, हे सांगताना ती अडखळत होती. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या तपासात तिनेच इतर दोघांच्या मदतीने ही हत्या केल्याचे उघड झाले.

हत्येपूर्वी रविवारी प्रियांकाने आई वडिलांना नाश्त्यात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या होत्या. त्यामुळे दोघांना झोप लागली. त्यानंतर तिने आपला प्रियकर इकलाख खान व त्याच्या मित्राला बोलावून घेतले. ते दोघे आल्यावर त्यांनी चाकूने दोघांचा गळा कापला आणि डोक्यावर लोखंडी रॉडने वार करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर घर उघडे ठेवून तिघे निघून गेले. पण, दिवसभर कोणीही त्यांच्या घरी न फिरकल्याने हा प्रकार उघड झाला नाही. शेवटी प्रियांका रात्री आठ वाजता घरी आली व तिने आपल्या आई वडिलांची हत्या झाल्याचा व घरातून काही रक्कम चोरीला गेल्याचा कांगावा केला. पण पोलिसांनी त्यांचा कट उघडकीस आणून प्रियांका आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या.