Maharashtra

नागपुरमध्ये मुस्लिम वडिलांकडून हिंदू दत्तक मुलिचे कन्यादान

By PCB Author

April 13, 2018

मुलगी सुषमा चाचेरे आणि सुषमाचे अब्बू अहफाज अहमद वेगवेगळ्या धर्माची नावे ऐकून कदाचित गोंधळ उडू शकतो. पण बाप-लेकीचे हे अनोखे नाते नागपूर जिल्ह्यात सध्या कौतुकाचा विषय ठरते आहे. कारण आपल्या मानलेल्या मुलीच्या कन्यादानासाठी या बापाने धर्माच्या भिंती सहज ओलांडल्या आणि हिंदू रितीरिवाजांनुसार सुषमाचे लग्न थाटामाटात लावून दिले. अहफाज अहमद हे नागपूरमधील कामठी नगरपरिषदेचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. १८ वर्षापूर्वी अहफाज अहमद यांची ११ वर्षीय मुलगी ब्रेन ट्युमरने दगावली. शेजारच्याच चाचेरे कुटुंबातली लहानगी सुषमा त्यांनी आपल्या कुशीत घेतली. जेवढे सुषमाला आई-वडील प्रिय त्याहून जास्त माया ती अम्मी-अब्बूवर. तिच्या अम्मी अब्बूंनीही तिला कशाचीच कमतरता भासू दिली नाही. वयात आल्यावर घरी लग्नाची चर्चा सुरू झाली. अहमद यांनी वडील म्हणून कर्तव्य बजावत सुषमाचे हिंदू धर्मात संपूर्ण विधीवत लग्नच लावले नाही तर तिचे कन्यादानही केले. थाटामाटात लग्न पडले. विशेष म्हणजे या लग्नाला नातेवाईकांनी स्वीकारले आणि पाठिंबाही दिला.