Desh

नांदेड न्यायालयाचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री ए. चंद्राबाबू नायडूसह १३ जणांना अटक करण्याचे आदेश

By PCB Author

September 14, 2018

नांदेड, दि. १४ (पीसीबी) – गोदावरी नदीवरील बाभळी प्रकल्पाविरुद्ध आठ वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनाप्रकरणी नांदेडमधील न्यायालयाने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री ए. चंद्राबाबू नायडू यांच्यासह १३ जणांविरुद्ध अटक वॉरंट बजावले असून न्यायालयाच्या आदेशानंतर आंध्र प्रदेश व तेलंगणमधील राजकीय वातावरण तापले आहे. तेलगू देसम पक्षाने दोन्ही राज्यांमध्ये आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चंद्राबाबू नायडू हे २०१० मध्ये आंध्र प्रदेशमधील विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी नायडू यांनी नांदेडमधील बाभळी प्रकल्पाविरोधात आंदोलन केले होते. तेलंगणमधील पाणी अडवल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आंदोलनाप्रकरणी नायडू यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, त्यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने नायडू यांना पुण्यातील तुरुंगात नेण्यात आले होते. नायडू यांच्यासह डी. उमामेश्वरा राव, एन. आनंद बाबू, जी कमलाकर आणि १० जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली होती. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणणे, दुखापत करणे व अन्य कलमांखाली ही कारवाई करण्यात आली होती.

या प्रकरणी नांदेडमधील प्रथम दंडाधिकाऱ्याने न्यायालयाने नायडू व अन्य आरोपींविरोधात गुरुवारी अटक वॉरंट बजावले. सर्वांना अटक करुन २१ सप्टेंबरपर्यंत न्यायालयात हजर करावे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.