नव्या कार्यकाळातील पहिल्या आदेशावर केली मुख्यमंत्र्यांनी सही

0
668

मुंबई, दि.२५ (पीसीबी)- नव्या कार्यकाळातील पहिल्या आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सही केली. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धनादेशावर त्यांनी ही सही केली. हा सही केलेला धनादेश त्यांनी कुसूम वेंगुर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला.

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पक्षाला राज्यात सरकार स्थापन करता आले नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवण्यात राज्यातील शेकडो रुग्णांना अडचणी येत होत्या. मंत्रालयात या निधीच्या कक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर गरजूंच्या रांगा लागल्याचेही विविध माध्यमांनी आपल्या वृत्तांमधून दाखवले होते. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर तर ही परिस्थिती आणखीनच गंभीर बनली होती. त्यामुळे नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांनी याकडे लक्ष घालावे अशी विनंती विविध राजकीय नेत्यांनी केली होती.

दरम्यान, शनिवारी देवेंद्र फडणीस यांनी नव्या सरकारसाठी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सोमवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी मंत्रालयात नव्या सरकारमधील मुख्यमंत्री म्हणून पहिली सही मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धनादेशावर केली.