नवे संशोधन, कोरोना मुळे ब्रेन स्ट्रोक

0
316

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – जगभरात थैमान घेतलेल्या कोविड-१९ आजारावर विविध देशांमध्ये सध्या संशोधनं सुरु आहेत. दरम्यान, एका परदेशी विद्यापीठातील वैज्ञानिकांनी या आजाराबाबत नवा इशारा दिला आहे. करोनासंबंधित मेंदुच्या आजारांची नवी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) येथील एका संशोधनानुसार, करोनाची लागण झालेल्या काही रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्यांपैकी ४३ रुग्णांच्या मेंदूचे कार्य बिघडलेले आढळून आले. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये स्ट्रोक, मेंदूच्या नसा खराब होणे आणि मेंदूशी संबंधित इतर विपरित परिणाम झालेले आढळून आले आहेत. यासंबंधी संशोधन करणाऱ्या संशोधकाचं म्हणणं आहे की, कोविड आजार हा रुग्णाचा मेंदू निकामी करु शकतो.

युसीएल इन्स्टिट्युट ऑफ न्युरोलॉजीचे मायकल झांडी यांनी सांगितले की, “कोविड महामारीचे परिणाम म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणावर ब्रेन डॅमेज झालेले दिसून येऊ शकतात. सन १९१८ मध्ये आलेल्या इन्फ्लुएन्जा (ताप) महामारीप्रमाणे १९२०, १९३० मध्ये encephalitis lethargica चा उद्रेक झाला होता. यावेळीही रुग्णांमध्ये मेंदू संबंधीत अशीच लक्षणे आढळून आली होती.

युसीएलमधील अभ्यासानुसार, कोविड-१९ हा नवा करोना विषाणू आहे. हा जास्त करुन श्वसनासंबंधीचा आजार असल्याने तो आपल्या फुफ्फुसांवर आघात करीत असल्याचे आढळून येते. पण मंदूसंबंधी आजारांवरील संशोधक आणि मेंदूचे विशेषज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कोविड-१९ च्या आजाराचे मेंदूवर परिणाम करणारे काही पुरावे समोर येत आहेत. युसीएलमध्ये झालेलं संशोधन हे ब्रेन नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

कॅनडातील वेस्टर्न युनिव्हर्सिटीतील न्यूरोसायंटिस्ट अॅड्रिअन ओवेन म्हणतात, “जगात सध्या कोविड-१९चे लाखोंवर रुग्ण आहेत. जर वर्षभरात १० दशलक्ष रुग्ण आढळून आले आणि त्यांच्यामध्ये आकलनशक्ती कमी झाल्याचे दिसून आले तर त्यांच्या कामाच्या क्षमतेवर आणि दैनंदिन जगण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.”

युसीएलमधील या संशोधनातील सहवैज्ञानिक रॉस पिटरसन यांच्या मते, “कोविड-१९ हा आजार सुरु होऊन आत्ता काहीच महिने झाले आहेत, त्यामुळे आपल्याला अजून माहिती नाही की हा आजार अजून किती काळ नुकसान करणार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी आता या आजाराचे मेंदूवर होणाऱ्या संभाव्य शक्यतांबाबत जागृत रहायला हवं. यावर लवकरात लवकर उपचार झाले तर रुग्णाला गंभीर परिणामांपासून वाचवता येऊ शकते.”

ओवेन म्हणतात, “कोविडचे मेंदूवर होणाऱ्या परिणामांचा मोठ्या प्रमाणावर आणि खोलवर अभ्यास होणे गरजेचे आहे. यासाठी जगभरतून डेटा कलेक्शन व्हायला हवं. याचा भविष्यात खूपच मोठ्या प्रमाणावर लोकांवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे आत्ताच याबाबत माहिती गोळा करीत राहणे खूपच गरजेचे आहे.”