Maharashtra

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा महत्वाचा निर्णय

By PCB Author

June 28, 2022

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेत हा प्रश्न मार्गी काढला आहे. सध्या राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकीय संघर्षादरम्यान नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी होकार दिला आहे. यासंदर्भातील माहिती प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय एकनाथ शिंदेंनी दिलेल्या प्रस्तावाच्याविरोधात आहे. या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून विचाराधीन होता. एकनाथ शिंदे यांनीच गेल्या वर्षी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. मात्र, यावरून स्थानिकांनी मोठा विरोध दर्शवला होता.

विमानतळ प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक सर्व समाजातील लोकांना मातोश्रीवर बोलावून त्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याला होकार असल्याचं कळवलं आहे. “भूमिपुत्रांची इच्छा होती. ती इच्छा आज उद्धव ठाकरेंनी पूर्ण केली आहे. आम्ही अनेकदा विनंती केली होती, पत्रं पाठवली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व समाजाच्या लोकांना मातोश्रीवर बोलवलं आणि तुमची जी इच्छा आहे, भावना आहेत, त्यांचा सन्मान राखून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचं निश्चित केलं”, अशी माहिती विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी दिली.