नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं – राज ठाकरे

0
267

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : नवी मुंबई विमातनतळ नामकरणावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना स्थानिकांकडून दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. दरम्यान या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं असून नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं असं मत मांडलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट घेतल्यानंतर मुंबईतील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे. तर बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून संघर्ष होत असून पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे प्रशांत ठाकूर आले होते,” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

“कोणतंही विमानतळ जेव्हा येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर येतं. त्यामुळे तेव्हाच्या मुंबईप्रमाणे ते सांताक्रूझमध्ये आलं. नंतर वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि त्याला सांताक्रूझ आणि सहार विमानतळ असं नाव मिळालं. नवी मुंबईच्या विमानतळाचा प्रस्ताव आला तेव्हा मला आत्ताचं विमानतळ देशांतर्गत आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय होणार अशी माहिती देण्यात आली होती. ते जरी नवी मुंबईत, पनवेलमध्ये होत असलं तरी ते मुंबई विमानतळच असणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव राहणार असं मला वाटतं. हे सध्याच्या देशांतर्गंत विमानतळाचा विस्तारित भाग आहे. हा महाराष्ट्र असून मुंबई राजधानी आहे. परदेशातून व्यक्ती महाराष्ट्रात येतो तेव्हा शिवरायांच्या भूमीत येतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवरायांचं नाव असेल असं मला वाटतं,” असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

“हे काही सिडकोनं मंजूर केलं नी राज्यानं प्रस्ताव केला असं नाही. हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने होईल. बाळासाहेब किंवा दि. बा. पाटील यांच्या मोठपणाबद्दल दुमत नाही,” असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

“आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलत आहोत या गोष्टींचं भान असायला हवं. जे नाव आहे ते कसं बदलणार?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली. “बाळासाहेब असते तर त्यांनी स्वत: सांगितलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असायला हवं. नामांतराचा वाद हेच दुर्दैव आहे. खरंतर विमानतळ लवकर होण्यासाठी राज्य सरकारनं रेटा लावला पाहिजे. अडचणी येत असतील तर ते सोडवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. नावात वैगेरे सगळे लोकं गुंतून राहतात म्हणून ते सोयीचं असतं. महाराष्ट्रात येणारं विमान शिवाजी महाराजांच्या भूमीत येणार त्यामुळे त्यांचंच नाव असायला हवं,” असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. महाराजांचं नाव देणार असतील तर आम्ही विरोध करणार नाही असं प्रशांत ठाकूर म्हणाल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

आता कोण रस्त्यावर उतरतं बघू असं सांगताना राज ठाकरेंनी वेळ आली तर उद्धव ठाकरेंशी बोलेन. पण यामध्ये काही विषय दिसत नाही असं सांगितलं आहे. तसंच ज्यांना राजकारण करायचं आहे ते त्यांनी करावं. पण होणार काय ते मी सांगितलं आहे असंही म्हणाले.

दरम्यान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दि बा पाटील यांचं नाव देण्याची भूमिका घेतल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राजू पाटील माझ्या भेटीला आले होते. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा हा विषयच संपला असं त्यांनी सांगितलं. महाराजांच्या पुढे अजून कोणाचं नाव येऊच शकत नाही. महाराज आपली ओळख आहेत. महाराजांच्या भूमीतले म्हणून आपल्या ओळखतात. त्यामुळे येथे जो कोणी येईल तो महाराजांच्या भूमीत येईल,” असं ते म्हणाले.