“नवीन रुग्ण तयार न होण्यासाठी सामाजिक संस्थांनी प्रशासनासोबत काम करायला हवे”

0
292

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) : राज्यात कोरोना रुग्णानाचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा कोरोना रुग्ण सापडत आहेत. यावरती सर्व प्रकारची खबरदारी घेऊन सुद्धा रुग्ण संख्या वाढत आहे. यावरती निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी “मोठ्या प्रश्नांचे छोटे तुकडे करून ते सोडवले पाहिजेत. तसेच प्रशासनाने दूरदृष्टी ठेवून अगदी वाईट परिस्थितीत काय करावे लागेल, याचे युद्धपातळीवर नियोजन करायला हवे. तात्पुरत्या स्वरूपात छोटे प्रशासकीय युनिट तयार करून काम केल्यास प्रशासनाला सूक्ष्म नियोजन करता येईल आणि निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करता येईल. कोरोना साथीचा मुकाबला करताना नवीन रुग्ण तयार होणार नाहीत, यावर लक्ष देणे फार गरजेचे आहे. प्रशासनाने सामाजिक संस्थांनी मदत घ्यावी”, असे मत व्यक्त केले.

“प्रशासनाला कोरोना साथीबाबत भविष्यवेध घेता आला नाही. प्रशासनाने जागतिक आणीबाणी जाहीर झाल्यानंतरच तयारी करणे गरजेचे होते. नवीन रुग्ण तयार न होण्यासाठी सामाजिक संस्थांनी प्रशासनासोबत काम करायला हवे. मायक्रो लेव्हलवर काम करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणणं देखील गरजेचं आहे. सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन प्रशासनावर दबाव आणणं महत्वाचं आहे. रुग्ण संख्या कमी होण्यावरही प्रशासनाने भर द्यायला हवा”, असं झगडे म्हणाले.

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम, उन्मुक्त युवा संगठन, पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, थेरगाव सोशल फाउंडेशन, आरोग्य मित्र, कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन, दीपक फाउंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांचा नागरिकांशी आणि सर्व सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे लाईव्ह संवाद आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. झगडे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून देखील काम केले आहे. ते पुण्यात आयुक्त असताना स्वाइन फ्ल्यूची साथ आली होती. त्या साथीच्या आजारात प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे झगडे यांनी विवेचन केले. आपत्तीच्या वेळी 90 ते 95 टक्के काम हे प्रशासनाचे असते आणि उर्वरित काम हे जनतेचे असते. कुठल्याही आजाराची साथ येते तेव्हा डॉक्टरांची भूमिका ही निर्णायक असते. त्यांना योग्य ते मार्गदर्शन तज्ज्ञांकडून मिळणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाचा जागतिक अभ्यास कुठेतरी कमी पडला आहे. लॉकडाऊन लावणे हे प्रशासकीय अपयश आहे. प्रशासनाने 90 टक्के काम नवीन रुग्ण तयार होणार नाहीत यासाठी करावे. प्रत्येक गोष्टीचे वॉर्डनुसार नियोजन करून जबाबदऱ्यांचे वाटप करावे. नागरिकांशी दैनंदिन संवाद करावा. राजकीय पक्षांनी देखील यात सहभागी व्हायला हवं. शासनाने सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे. बूथनिहाय लसीकरण करण्यावर भर द्यायला हवा, असेही झगडे यांनी सांगितले.