“नवाब मलिक यांनी सांगितलेली गोष्ट इंटरव्हलपर्यंतची; त्या नंतरची पुढची गोष्ट मी सांगेन”

0
249

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : प्रभाकर साईल यांनी एनसीबीच्या छापेमारीची पोलखोल केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. वसुली गँग कुणाच्या होत्या. मी सांगितलं ना. इंटरव्हलपर्यंतची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे, इंटरव्हलनंतरची कथा स्क्रिनप्ले मी तुम्हाला सांगेन, असं सांगतानाच या प्रकरणातील तथ्य आणि सत्य धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय होतं त्याची चौकशी झाली पाहिजे, असं राऊत म्हणाले.

याप्रकरणातील साक्षीदाराचा बालही बाका होणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठी आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत आहेत. या मुलाने मोठं धाडस केलं. त्याने देशावर उपकार केले. मी त्याच्या धाडसाचं कौतुक करतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी बाहेर येतील. आता मलिक यांनी काही गोष्टी बाहेर आणल्या. आता इंटरव्हलनंतर बाकीची स्टोरी बाहेर येईल, असं ते म्हणाले.

भाजपने या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सीबीआयची चौकशी व्हावी. जरुर व्हावी. सीबीआय तुमच्या खिशात आहे ना? तुम्हीही अनेक व्हिडीओ बाहेर आणले. पण तुमच्या काळजाला वार झाला. तुम्ही म्हणताय ना चौकशी करा… करा. अजून दहा व्हिडीओ मी तुम्हाला देतो, करा चौकशी, असं आव्हानच त्यांनी दिलं.

केपी गोसावी, परमबीर सिंग कुठे हे भाजपला माहीत असेल. गोसावीचा घातपात झाला की नाही हे ज्याने शंका उपस्थित केली. तेच सांगू शकतील. किंवा त्यांचे समर्थक पार्टीच सांगेल, असं ते म्हणाले. या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. सॅम डिसोजाचा संदर्भ मनी लॉन्ड्रिंगमध्ये येते. बड्या लोकांचे पैसे तो परदेशात पाठवतो. माझी मागणी आहे या प्रकरणाची चौकशी करावी, असंही त्यांनी सांगितलं.

साईल हा अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याची सुरक्षा केली पाहिजे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांशी बोललो. राज्याला बदनाम करण्याचं षडयंत्रं रचलं गेलं. त्याला काही अधिकाऱ्याने हे बिंग फोडलं. पण या मुलाने बिंग फोडलं. त्याच्या साहसाला मी दाद देतो. त्याने देशावर उपकार केले, असंही त्यांनी सांगितलं.