“नवाब मलिक माझी मृत आई आणि तिचा धर्म याप्रकरणात मध्ये का आणताय?”: समीर वानखेडे

0
343

– माझ्या जन्मगावी जाऊन माझ्या वंशाची पडताळणी करू शकतात, पण अशी घाण पसरवू नये. मी हे सर्व कायदेशीररित्या लढेन”

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश असलेल्या ड्रग्स प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. शिवाय एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विट करत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री नवाब मलिक माझी मृत आई आणि तिचा धर्म या प्रकरणात मध्ये का आणत आहेत, असा सवाल केला आहे.

दरम्यान, मलिक यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले की, “नवाब मलिक यांनी त्यांच्या जन्माच्या प्रमाणपत्रासंदर्भात नुकत्याच केलेल्या ट्विटबद्दल मला कळले. माझ्या जन्म प्रमाणपत्राचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. तरीही हे सर्व इथं एकत्र करण्याचा घाणेरडा प्रयत्न आहे. माझी आई मुस्लिम होती म्हणून त्यांना माझ्या मृत आईला या सगळ्यात आणायचे आहे का? माझी जात आणि कौटुंबीक पार्श्वभूमी पडताळून पाहण्यासाठी तो, तुम्ही किंवा कोणीही माझ्या जन्मगावी जाऊन माझ्या पणजोबांकडून माझ्या वंशाची पडताळणी करू शकतात, पण त्यांनी अशी घाण पसरवू नये. मी हे सर्व कायदेशीररित्या लढेन आणि न्यायालयाबाहेर यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही,” असं त्यांनी सुत्रांशी बोलताना म्हटल्याचं एनडीटीव्हीने म्हटलंय.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनाही या प्रकरणात अडकवून अटक होण्याची भीती सतावत आहे. त्यांनी रविवारी मुंबई पोलीस प्रमुखांना पत्र लिहून आपल्याला कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे.