नवाझ शरीफांना धक्का, कोर्टाच्या ‘या’ निर्णायामुळे पुन्हा पंतप्रधान होता येणार नाही?

0
424

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दणका दिला. पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी घटनेतील कलम ६२ अंतर्गत दोषी ठरलेला लोकप्रतिनिधी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर आजीवन बंदी घातली जाईल. त्यांना पुन्हा त्या पदावर कधीच काम करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. याच कलमाअंतर्गत नवाझ शरीफही दोषी ठरले असून सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आता त्यांना देखील लागू होण्याची शक्यता आहे.

पनामा पेपर्स प्रकरणात पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्टाने नवाझ शरीफ यांना दोषी ठरवत ते पंतप्रधानपदासाठी अपात्र आहेत, असा निकाल जुलै २०१७ मध्ये दिला होता. ‘पाकिस्तानच्या घटनेच्या कलम ६२ आणि ६३ अन्वये संसदेचा सदस्य नेहमीच सत्यवादी आणि प्रामाणिक असणे गरजेचे आहे. मात्र, नवाझ शरीफ यांनी देशवासीयांना मालमत्तेविषयी खोटी माहिती देऊन घटनेची पायमल्ली केली, असे सुप्रीम कोर्टाने निकाल देताना म्हटले होते.

पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने शुक्रवारी घटनेतील कलम ६२ चे उल्लंघन करणाऱ्या सरकारी नोकर आणि लोकप्रतिनिधींवरील कारवाई ही आजीवन असेल, असे स्पष्ट केले. असे लोकप्रतिनिधी हे निवडणूक लढवू शकत नाही किंवा एखाद्या पदावरही राहू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. जनतेला चांगलं वर्तन करणारा नेता हवा, असे कोर्टाने निकाल देताना सांगितले. या निर्णयाचा फटका आता नवाझ शरीफ यांना देखील बसण्याची चिन्हे आहेत. हा आदेश आता नवाझ शरीफ यांनाही लागू होऊ शकतो.