Bhosari

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड पोलिसांची अवैध धंद्यांवर छापेमारी; ‘एवढ्या’ लाखांचा दारूसाठा जप्त

By PCB Author

January 01, 2021

तळेगाव दाभाडे, दि. १ (पीसीबी) – नववर्षाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहर परिसरात हॉटेलमधून विकली जाणारी बेकायदेशीर, विनापरवाना दारू, अवैध दारू विक्रेते, दारूभट्ट्या लावणारे आणि जुगार अड्ड्यावर छापे टाकून तीन लाख 81 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात एकूण 22 जणांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस ठाण्यात 10 जणांच्या विरोधात सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात पोलिसांनी 95 हजार 367 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

चिंचवड पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील दोन गुन्ह्यात अवैधरित्या दारू विक्री करणा-यांवर तर एका गुन्ह्यात हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या तीन कारवायांमध्ये 56 हजार 139 रुपयांची देशी, विदेशी दारू, बियर आणि हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून त्यात पोलिसांनी एक हजार 10 रुपयांची हातभट्टीची दारू जप्त केली आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यात 5 हजार 204 रुपयांची दारू जप्त केली आहे.

निगडीमध्ये दोन कारवाया करत पोलिसांनी 2 हजार 340 रुपयांची दारू जप्त केली आहे. दिघी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून त्यात एक हजार 560 तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एक हजार 32 रुपयांची दारू जप्त केली आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून शिरगाव पोलिसांनी पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या दारूभट्टीवर कारवाई करून दोन लाख एक हजारांचे दारू बनविण्याचे रसायन व इतर साहित्य जप्त केले. दुस-या कारवाईमध्ये शिरगाव पोलिसांनी 18 हजार 78 रुपयांची देशी, विदेशी आणि हातभट्टीची दारू जप्त केली आहे.