नवरी नटली; राखी सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार

0
1909

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून सवंग प्रसिद्धी मिळवण्यात आघाडीवर असलेली राखी सावंत चक्क लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिने स्वत:ची लग्न पत्रिका इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दीपक कलालसोबत ती विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजत आहे.

दीपक कलालनेही लग्नपत्रिका शेअर केली असून आम्ही दोघेही ३१ डिसेंबरला लॉस एन्जलिस इथे विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले आहे. दीपक कलालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून राखी सावंतला प्रपोज केले होते. मात्र महिन्याभरापूर्वी या प्रपोजलवर राखीने एका मुलाखतीत नाराजीची प्रतिक्रिया नोंदवली होती. जगात लग्नासाठी दीपक कलाल हा एकमेव उरला तरीही मी त्याच्याशी लग्न करणार नाही, मी त्याला सोशल मीडियावरून ब्लॉक केलं असून लग्नाचा विचार त्याने कायमस्वरूपी डोक्यातून काढून टाकावा असेही ती म्हणाली होती.

मात्र महिन्याभरात राखीचा विचार कसा बदलला याचा विचार आता सगळेच करत आहे. राखीने ‘राखी का स्वयंवर’ या रिअॅलिटी शोमधून टॉरंटोमधील इलेश पारूजानवालाशी साखरपुडाही केला होता. शोमध्ये या दोघांचे लग्नही झाले असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच राखी इलेशपासून विभक्त झाली.

राखीने जरी दीपक कलालसोबत लग्न करणार असल्याचे जाहीर केले असले तरी हा तिचा पब्लिसिटी स्टंटही असू शकतो असे म्हटले जात आहे. त्यामुळे राखी ३१ डिसेंबरला खरेच दीपक कलालसोबत लग्न करते की हा केवळ पब्लिसिटी स्टंट ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.