Pimpri

“नवरात्रोत्सवात शहरात गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी” : राजेश पाटील यांचे आदेश

By PCB Author

October 06, 2021

पिंपरी, दि.६ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास बंदी असल्याचे निर्देश आयुक्त राजेश पाटील यांनी निर्गमित केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दि. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी नवरात्रोत्सव २०२१ बाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयुक्त राजेश पाटील यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे.

त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्या अनुषंगाने नवरात्रोत्सवासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश निर्गमित केले असून त्यानुसार नवरात्रोत्सवामध्ये देवीची मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता ४ फुट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फुटाच्या मर्यादेत असावी, देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यावर बंदी असेल, देवीच्या दर्शनाची सुविधा केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी, सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे तसेच दस-याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम कोरोना विषयक नियमांचे पालन करून करावा, रावण दहनाकरिता प्रेक्षक न बोलविता कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने दाखविण्याची व्यवस्था करण्यात यावी.