नवरदेवाला कोरोना, आख्खे वऱ्हाड क्वारंटाईन

0
350

वर्धा, दि. ८ (पीसीबी) : लग्न करातना काही पथ्य पाळा असे घसा कोरडा होईपर्यंत शासन सांगते आहे, पण जनता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्याचे व्हायचे तेच परिणाम होत आहेत. कोरानाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त नातेवाईकांना परवानगी नाही. मात्र, वर्ध्यात प्रचंड गर्दीत एक विवाह सोहळा पार पडला. पिपरी मेघे येथे 30 जून रोजी हा विवाह समारंभ पार पडला. विशेष म्हणजे लग्नानंतर अवघ्या आठ दिवसांनीच नवरदेवला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या लग्नात सहभागी झालेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणं, हे प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे.

पिपरी मेघे येथे 30 जून रोजी मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला प्रचंड गर्दी होती. या लग्नासाठी अमरावतीसह विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी आले होते. लग्नानंतर ते परत अमरावतीलाही गेले. पण लग्नानंतर सहा दिवसांनी म्हणजेच 5 जुलै रोजी नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागलं. याशिवाय नवरदेवात कोरोनाची इतर लक्षणेही आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने त्याची कोरोना चाचणी केली. या चाचणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

नवरदेवचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. लग्नात आणि लग्नापूर्वीच्या कार्यक्रमात नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. त्यामुळे तो अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली असतानासुद्धा नियमाचे भंग करण्यात आले. त्यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईसुद्धा केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, नवरदेवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेच परिसरात वार्ता पसरली. या लग्नाला ज्या व्यक्ती हजर होत्या त्यांनी स्वतःहून कोरोना चाचणीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. त्याचबरोबर वरातीमध्ये सामील झालेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु आहे.