नवज्योत सिंग सिद्धूचे शीर आणा, १ कोटी मिळवा – हिंदू युवा वाहिनी

0
767

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते व मंत्री नवज्योत सिंग सिद्धूचे शीर आणा आणि एक कोटी रूपये मिळवा, अशी घोषणा हिंदू युवा वाहिनीने केली आहे. विशेष म्हणजे हिंदू युवा वाहिनी ही संस्था योगी आदित्यनाथ यांच्याशी संबंधित असून    त्यांनीच या संस्थेची स्थापना केली आहे. हिंदू युवा सेनेचे आग्रा येथील प्रमुख तरूण सिंग यांनी ही वादग्रस्त  घोषणा केली आहे.  

योगी आदित्यनाथ यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्याचमुळे आम्ही त्याचे शीर आणणाऱ्या माणसाला एक कोटीचे इनाम देऊ, असेही तरुण सिंग यांनी  म्हटले आहे. राजस्थान येथील एका रॅलीमध्ये सिद्धूने भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवून घेतात. मात्र ते इमानदार नाहीत. चौकीदार चोर आहे, तर योगी आदित्यनाथ हे सर्वात मोठे भोगी आहेत, अशी टीका केली होती.

याबाबत हिंदू युवा वाहिनीने  सिध्दू यांच्यावर टीका केली आहे. नवज्योत सिंग सिद्धू आपल्या देशाबाबत,  नेत्यांबाबत चुकीची वक्तव्ये करत आहेत. हे त्यांना करणे शोभते का? हा देश आणि येथील माणसे   त्यांना पटत नसतील, तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावे, असाही इशारा हिंदू युवा वाहिनीने दिला आहे.