नवज्योत सिंग सिद्धूंचा मंत्रिपदाचा राजीनामा

0
400

चंदीगड, दि. १४ (पीसीबी) – काँग्रेस नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्याचा आज खुलासा केला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी १० जून रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे त्यांचा राजीनामा सादर केला आहे. पंजाबमध्ये सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नव्हते. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्याचे खापर सिद्धूंवर फोडून त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली होती. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीनंतर ६ जून रोजी झालेल्या पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत अमरिंदर सिंग यांनी सिद्धूसहीत अनेक मंत्र्यांचे खातेही बदलले होते. सिद्धूंकडे नागरी प्रशासन विभाग होता. आता त्यांच्याकडे ऊर्जा खात्याचा भार सोपविण्यात आला होता. त्यांनी याच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धू यांच्याकडील पर्यटन आणि सांस्कृतिक खातेही काढून घेण्यात आले होते.

अमरिंदर सिंग यांनी खाती काढून घेतल्याने संतप्त झालेल्या सिद्धू यांनी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन तक्रारही केली होती. त्यानंतर त्यांनी ‘काँग्रेस अध्यक्षांना भेटलो. पत्र दिले आणि परिस्थितीची माहितीही दिली,’ अशी पोस्ट ट्विटरवर टाकली होती.