नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानात निवडणूक लढल्यास नक्कीच जिंकतील – इम्रान खान    

0
590

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – काँग्रेस नेते व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग  सिद्धू माझ्या शपथविधीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मायदेशात त्यांच्यावर टीका झाली. ते केवळ शांतता आणि बंधुत्वाबद्दल बोलत होते. मात्र, त्यांच्यावर इतकी टीका का झाली ? हे मला समजले नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. तर त्यांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून निवडणूक लढवल्यास ते नक्कीच जिंकून येतील, असा विश्वास इम्रान खान यांनी यावेळी व्यक्त केला.

सिद्धू तुम्ही येथून निवडणूक लढवावी. लोक तुमच्यावर भरपूर प्रेम करतात तुम्ही नक्कीच निवडणूक जिंकाल, असेही इम्रान खान म्हणाले. पंजाबच्या गुरुदासपूर जिल्हयातील डेरा बाबा नानक व पाकिस्तानातील नरोवाल येथील गुरुद्वारा कर्तारपूर साहिब या दोन ठिकाणांना जोडणारा रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्या समारंभासाठी सिद्धू पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. यावेळी इम्रान खान बोलत होते.

भारत-पाकिस्तान दोन्ही देशांनी मतभेद विसरुन पुढे जावे. भारत आणि पाकिस्तानने मागच सर्व काही विसरुन पुढे गेले पाहिजे. आपला भूतकाळ आपल्याला पुढे जाण्यापासून रोखत आहे, असे इम्रान खान म्हणाले. यावेळी त्यांनी सिद्धूचे तोंडभरून कौतुक केले. दरम्यान, यापूर्वी इम्रान खान यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमालाही सिद्धू पाकिस्तानला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर भारतात टीकेची झोड उठवण्यात आली होती.