Chinchwad

नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांनी केला पर्दाफाश

By PCB Author

April 14, 2024

दि १४ एप्रिल (पीसीबी )- चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सहा महिलांना वाकड पोलिसांनी अटक केली असून त्यांना १६ एप्रिल पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सहा आरोपी महिलांमध्ये एक परिचारिका असून ती मुख्य सूत्रधार असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरातील वाकड परिसरात नवजात बालकांची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. काही महिला जगताप डेअरी या ठिकाणी नवजात बालक विकण्यासाठी येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी सापळा रचला.१२ एप्रिल रोजी दुपारी सव्वाचार च्या सुमारास दोन रिक्षातून सहा महिला उतरल्या, त्यांच्याकडे सात दिवसांच नवजात बालक होतं. संशय बळावल्याने महिलांना वाकड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी नवजात बालका विषयी विचारपूस केल्यानंतर महिलांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. वाकड पोलिसांनी सहा महिलांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली.आरोपी महिला अवघ्या सात दिवसांच नवजात बालक विकण्यासाठी आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. धक्कादायक बाब म्हणजे याआधी देखील या महिला आरोपींनी पाच नवजात बालक विकल्याचं पोलीस चौकशीत उघड झाल आहे. महिला आरोपींमध्ये एक परिचारिका असून ती खाजगी रुग्णालयात काम करते. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या पालकांना हेरून परिचारिका त्यांना पैशाचं अमिश दाखवून नवजात बालक विकत घ्यायची. तेच बालक तिच्या टोळीच्या मदतीने इतर मुल- बाळ नसलेल्या पालकांना विकून त्यांच्याकडून पाच ते सात लाख रुपये घ्यायची. अखेर बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे