Desh

नरेंद्र मोदी म्हणजे अॅनाकोंडा, आंध्र प्रदेशच्या मंत्र्याची टीका

By PCB Author

November 04, 2018

आंध्र प्रदेश, दि.४ (पीसीबी) – दोन दिवसांपूर्वीच काँग्रेससोबत ‘हात’मिळवणी केल्यानंतर आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलगू देसम पक्षाचे नेते आणि मंत्री यनामाला रामकृष्नुदु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘जहरी’ टीका केलीय. मोदी हे राष्ट्रीय संस्थांना गिळंकृत करणारे अॅनाकोंडा आहेत. मोदींपेक्षा मोठा अॅनाकोंडी कोणी असू शकतो का? ते सीबीआय, आरबीआयसारख्या संस्थांना गिळंकृत करत आहेत. ते रक्षक कसे असू शकतात, असे ते म्हणाले.  रामकृष्नुदु हे तेलगू देसम पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री आहेत. त्यांनी मोदींची तुलना थेट अॅनाकोंडाशी केली आहे. मोदी हे सर्व सरकारी संस्था गिळंकृत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. देशाला भाजपपासून वाचवणे हे आमच्या पक्षाचे कर्तव्य आहे. देश, लोकशाही आणि संवैधानिक मूल्ये जपण्याची प्राथमिक जबाबदारी आपली प्रत्येकाचीच आहे, असे सांगून त्यांनी भाजप, मोदींसह वायएसआर काँग्रेस आणि जनसेनेवरही हल्ला चढवला. हे सर्व पक्ष राष्ट्रीय संस्था आणि लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या मोदींचे समर्थन करत आहेत, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. प्रदेश भाजपनंही त्यांच्या टीकेला उत्तर दिलेय. चंद्राबाबू नायडू हे ‘भ्रष्टाचाराचे राजा’ आहेत. त्यांनी केलेला भ्रष्टाचार आता उघड होईल, असे भाजपने म्हटले आहे.