Maharashtra

नरेंद्र मोदींनी कृषी कायदे रद्द करताच दरेकर म्हणतात, ‘आजचा दिवस काळा’

By PCB Author

November 19, 2021

मुंबई, दि.१९ (पीसीबी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सन्मान राखत तीन कृषी कायदे मागे घेतले. आणि आता नवी सुरुवात करूया असं त्यांनी म्हंटल. मात्र, दुसरीकडे भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र आजचा दिवस काळा असल्याचं म्हटलं आहे.  प्रवीण दरेकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना साधला. त्यावेळी ते बोलत होते. ‘आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणून शरद जोशींनी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं. शेतकऱ्यांच्या पायातल्या शृंखला दलालांच्या बेड्या आपण काढा. शेतकऱ्यांना बाजारात मुक्त व्यवहार करू द्या. त्यांच्या बांधावर माल खरेदी करू द्या. दलाल, ट्रान्स्पोर्ट, कमिशन हे सर्व जाईल तरच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल, असं शरद जोशी म्हणायचे’, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरेकर पुढे असंही म्हणाले कि, ‘जेव्हा केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले तेव्हा मी म्हणालो होतो की, शरद जोशींच्या आतम्याला शांती लाभली असेल. आज शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी कायदे मागे घ्यावे लागले आहेत. मला वाटतं पुन्हा शरद जोशींचा आत्मा अस्वस्थ झाला असेल, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आंदोलनातील हवा निघून काढून घेतली आहे. विषय प्रतिष्ठेचा न करता मोदींनी शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणेच केलं आहे. त्यांनी स्वत:च्या मनासारखं केलं नाही. हा कायदा देशातील 80 टक्के शेतकऱ्यांसाठी होता. ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरापेक्षा कमी शेती आहे. त्यांच्या आर्थिक विकासासाठी हे कायदे आणले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांचा सात वर्षातील इतिहास पाहा. यापूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने 2009ला 69 हजार कोटीचं पॅकेज दिलं. त्याचं तुणतुणं आपण अजून वाजवतो.पण पंतप्रधान मोदी हे पीएम किसान योजने अंतर्गत दरवर्षी 80 हजार कोटी शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये देत आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी हे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत’, असं त्यांनी सांगितलं.