नमस्कार…मी लोकसभेचा या पक्षाचा उमेदवार, माझ्यावर आहेत एवढे गुन्हे दाखल…

0
832

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – “नमस्कार… मी… पक्षाचा उमेदवार असून माझ्यावर…हे…हे… गुन्हे दाखल आहेत”, अशी जाहिरात पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना तशी आचारसंहिताच घालून दिली आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवारांना निवडणूक प्रचारादरम्यान स्वतःवर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या माहितीची वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलवर किमान तीन वेळा जाहिरात द्यावी लागणार आहे.

निवडणुकीच्या वेळी एखाद्या पक्षाच्या उमेदवारावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराकडून देण्यात येते. मात्र आता लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला स्वतःच त्याची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून द्यावी लागणार आहे. असा नियमच निवडणूक आयोगाने केला आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना लोकप्रतिनिधी होण्यापासून दूर ठेवण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे आता मतदारांचीही जबाबदारी वाढणार आहे.

राजकारणातील गुन्हेगारीकरण वाढत असल्याची टिका होत आहे. राजकीय पक्षांकडूनही अशा प्रकारच्या लोकांना निवडणुकीत तिकीट दिले जाते. राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा बसावा किंवा प्रवेश मिळू नये, यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना उमेदवारीच देता कामा नये, अशी मागणीही केली जाते. अनेक उमेदवार आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती लपवतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व उमेदवारांना गुन्हे आणि चालू असलेल्या खटल्यांची माहिती सादर करणे बंधनकारक केले आहे.

निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या उमेदवारांनी गुन्ह्यांची माहिती न दिल्यास संबंधित उमेदवारांची उमेदवारीच रद्द होणार आहे. उमेदवाराकडून सादर करण्यात येणारी माहिती फक्त निवडणूक आयोगाकडेच असते. सामान्य नागरिक किंवा मतदारांना त्याची माहिती होत नाही. मात्र आता प्रत्येक उमेदवाराला त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती जाहीरपणे द्यावी लागणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपासून ते प्रचार संपण्यादरम्यान किमान तीनवेळा आपल्यावर दाखल गुन्ह्यांच्या माहितीचा प्रचार व प्रसार करणे प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक करण्यात आले आहे.

ही माहिती संबंधित उमेदवाराला वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून द्यायची आहे. यामुळे मतदारांना उमेदवारांवर असलेल्या गुन्ह्यांची माहिती होण्यास मदत होईल. मतदार स्वच्छ चारित्र्य पाहून मतदान करतील आणि चांगले उमेदवार लोकप्रतिनिधी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.