“नबाव मलिकांनी काँग्रेसला सल्ला द्यावा अशी त्यांची पात्रताच नाही”

0
292

मुंबई, दि.०२ (पीसीबी) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे पण कोणी लढण्यास तयार नसल्यास किंवा सारखं परदेशात जात असल्यास आम्ही तरी काय करणार, असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. युपीएचं अस्तित्व आहेच कुठे अशी विचारणाही त्यांनी केली. दरम्यान ममता बॅनर्जींच्या या टीकेवर राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे. अशा वक्तव्यांनी आम्ही अस्वस्थ होणार नाही असं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले कि, “ममता बॅनर्जी आज युपीएच्या सदस्यही नाहीत. आतापर्यंत भाजपाला जो विरोध केला आहे तो काँग्रेसने, युपीएने, राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी नेतृत्व काँग्रेसलाच करावं लागणार आहे. दरम्यान यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वास्तव स्विकारण्यासंबंधी दिलेल्या सल्ल्याबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “नबाव मलिकांनी काँग्रेसला सल्ला द्यावं हे काही योग्य नाही. काँग्रेसला सल्ला द्यावा अशी त्यांची पात्रताच नाही. देशात काँग्रेस पक्ष असून तो भाजपाला विरोध करणारा आहे. पर्याय म्हणून काँग्रेस असून सर्वांचं सहकार्य घ्यावं लागेल हे खरं आहे. युपीए सर्वांचं सहकार्य घेतच असतं,” असंही यावेळी ते म्हणाले.