नदीकाठी सापडलेल्या ‘त्या’ मृतदेहा प्रकरणी तिघे जण ताब्यात

0
283

मरकळ, दि. ८ (पीसीबी) – मरकळ गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या काठावर पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला. ही घटना एक जून रोजी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणात आळंदी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तिघांना ताब्यात घेतले आहे. किसन गेनभाऊ पारधी (वय 30, रा. च-होली खुर्द, ठाकरवस्ती, ता. खेड) असे मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोहन विठ्ठल ठाकर, अनिल सोमा ठाकर (दोघे रा. च-होली खुर्द, ठाकरवस्ती, ता. खेड), सचिन लक्ष्मण जाधव (रा पिंपळगाव पडक, ता. खेड) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक बापू मारुती जोंधळे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जून रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास मरकळ गावच्या हद्दीत फिरंगाई देवी मंदिराजवळ इंद्रायणी नदीच्या पात्रात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत किसन पारधी यांचा मृतदेह आढळला.

याबाबत सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्या घटनेचा तपास करून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तिघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या तिघांनी दारू पिण्याच्या कारणावरून मृत किसन पारधी यांना मारहाण करून त्यांचा खून केला होता. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोत्यात घालून किसन पारधी यांचा मृतदेह इंद्रायणी नदीच्या पात्रात फेकून दिला होता. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.