नदीकाठच्या आपत्तीजनक ठिकाणी ‘फ्लड सेन्सर्स’, ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ तैनात करा!

0
367

– भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांची मागणी

– पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी, दि.२८ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदीकाठच्या परिसरात पावसाळ्यातील अतिवृष्टीचा धोका लक्षात घेवून ‘फ्लड सेन्सर्स’ बसवण्यात यावेत. तसेच, मोठ्या प्रमणात पाणी साचणाऱ्या शक्य त्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ तैनात करावेत. ज्यामुळे महापालिका आपत्ती निवारण कक्षाला मदत होईल आणि आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध होईल्, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पवना धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यानंतर धरणातून विसर्ग केला जातो. त्यामुळे पवना नदीकाठच्या गावांमध्ये पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होत असते. पावसाळा आता सुरू झाला आहे. शहरातील रावेत, किवळे, चिंचवड, पिंपरी, पिंपळेनिलखसह नदीकाठच्या भागात पाणी घुसण्याचा धोका आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने आपत्ती निवारण कक्ष सुरू केला आहे. परंतु, रात्री-अपरात्री पाणी वाढल्यास काय करावे? अशी भिती नागरिकांमध्ये आहे. इंद्रायणी नदी काठच्या लोकवस्तीमध्येही तिच अवस्था आहे. यावर्षी पहिल्याच पावसात पवना नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली होती. धरणातून विसर्ग केला नव्हता, तरीही पुरस्थिती निर्माण झाली होती.

सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पण, यावर्षी पहिल्याच पावसात चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले. मंदिराचा काही भाग पाण्यात बुडाला होता, याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असेही दीपक मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात पाणी साचणाऱ्या शक्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करावेत. त्या कॅमेऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी जोडले जावे. तसेच, नदीकाठच्या भागात ‘फ्लड सेन्सर्स’ बसवण्यात यावेत. त्याद्वारे आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांना सतर्क राहता येईल. पर्जन्यवृष्टी वाढल्यास दर दोन तासांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ‘फ्लड सेन्सर्स’द्वारे संपूर्ण यंत्रणा सतर्क करता येईल. याबाबत महापालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

**सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा…
शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले जाते. पुणे-मुंबई महार्गावरील पुनावळे व ताथवडेसह वाकडमधील सेवा रस्त्यांवर पाणी साचले जाते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच, पुणे- मुंबई जुन्या महार्मावारील सब रस्ते जमिनीपासून सखल झाले आहेत. त्यामुळे संततधार पावसात अनेक ठिकाणी सब रस्त्यांवर पाणी साचले जाते. कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे सब रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्ता बंद होतो. त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी पाणी साचल्यास नागरिकांची तारांबळ उडते. त्याठिकाणी वाहतूक वळवण्याची गरज आहे. त्याची माहिती तात्काळ आपत्ती नियंत्रण कक्षाला होण्यासाठी शक्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे, अशी मागणी दीपक मोढवे-पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.