Sports

नदाल फ्रेंच ओपनच्या आणखी एका उपांत्य फेरीत

By PCB Author

June 10, 2021

पॅरिस, दि.१० (पीसीबी) : स्पेनच्या रॅफेल नदाल याने क्ले कोर्टवरील आपली मक्तेदारी कायम राखताना कारकिर्दीत फ्रेंच ओपन स्पर्धेच्या १४व्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने आज दिएगो श्वार्टझमनचा कडवा प्रतिकार ६-३, ४-६, ६-४, ६-० असा मोडून काढला.

उपांत्य फेरीत आता त्याची गाठ अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचशी पडू शकेल. नदालने आतापर्यंत येथे १३ विजेतीपदे मिळविली असून, त्याला १४वे विजेतेपद खुणावत आहे. त्याचबरोबर त्याचे हे २१वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद असेल. विशेष म्हणजे २०१९ पासून त्याने या स्पर्धेत प्रथमच एखादा सेट गमावला. त्याने येथे सलग ३६ सेट जिंकले आहेत.

स्पेनचा ३५ वर्षीय नदालने आता या स्पर्धेत १०५ सामने जिंकले असून, तो केवळ दोन लढती हरला आहे. कारकिर्दीत तो ३५व्यांदा ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोचला आहे. नदालने गेल्यावर्षी श्वार्टझमन याच्यावर उपांत्य फेरीत विजय मिळविला होता.

या वेळी दोघेही एकही सेट न हरता उपांत्यपूर्व फेरी पर्यंत पोचले होते. नदालने पहिला सेट जिंकल्यावर श्वार्टझमन याने दुसऱ्या सेटमध्ये नदालसमोर आव्हान उभे केले. दोन सेटची बरोबरी झाल्यावर मात्र नदालने आपला झंझावात दाखवून श्वार्टझमनला निष्प्रभ केले.

यंदाच्या स्पर्धेतील दुसरी उपांत्य लढत स्टेफानोस त्सित्सिपास आणि अॅलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होईल. त्सित्सिपासने उपांत्यपूर्व लढतीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याचे आव्हान ६-३, ७-६(७-३), ७-५ असे संपुष्टात आणले. त्सित्सिपासने या वर्षी लियॉन आणि मॉंटे कार्लो या क्ले कोर्टवरील स्पर्धा जिंकल्या आहेत. मेदवेदेवचा स्वैर खेळ त्याच्या पराभवास कारणीभूत ठरला. त्याच्याकडून ४४ निरर्थक चुका झाल्या.

जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेव याने सुरवातीच्या संथ सुरवातीनंतर स्पेनच्या अल्जेंड्रो डेव्हिडोविच फोकिना याचे आव्हान ६-४, ६-१, ६-१ असे मोडून काढले. मायकेल श्टिशनंतर या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा झ्वेरेव जर्मनीचा दुसरा टेनिसपटू ठरला.