Maharashtra

नगर अर्बन बँक गैरव्यवहार, दिवंगत दिलीप गांधी कुटुंब पुन्हा अडचणीत

By PCB Author

June 15, 2022

अहमदनगर, दि. १५ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांच्या दोन मुलांसह तीन जणांना न्यायालयाने वॉरंट बजावले आहे. नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार व दिलेले सर्व कर्जरकमा परत मिळत नसल्याने रिझर्व्ह बँकेने बंधने आणली आहेत. नगर अर्बन सस्पेन्स खाते घोटाळा प्रकरणात तिघांनाही येत्या मंगळवारी ( ता. 21 ) होणाऱ्या नगर अर्बन सस्पेन्स खाते घोटाळ्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. नगर अर्बन मल्टीस्टेटशेड्युल्ड बँकेत झालेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्यात भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र दिलीप गांधी आणि त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी तसेच संगीता अनिल गांधी या तिघांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिल्याने या तिघांनाही वॉरंट बजावून येत्या मंगळवारी ( ता. 21) होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे.

बँकेच्या सस्पेन्स खात्यातून 15 धनादेश वटवले गेले आहेत. यातून काही खासगी व्यक्तींची कर्ज थकबाकी अदा केली गेली आहे. बेकायदेशीरपणे झालेल्या या कृत्याबद्दल भारतीय रिझव्हं बँकेने नगर अर्बन बँकेला पाच लाखांचा दंडही केला आहे.

न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात आधी गांधी परिवारातील कोणाचेही नाव नव्हते. मात्र, बँकेचे लेखा परीक्षण करणाऱ्याच्या न्यायालयीन सरतपासणीत गांधी परिवारातील सुरेंद्र व देवेंद्र गांधी या बंधूंचे व संगीता अनिल गांधी या त्यांच्या चुलतीचे नाव स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्यांना समन्स बजावण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार या तिघांनाही समन्स बजावण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाच्या मागील तीन तारखांच्या सुनावणीस यापैकी कोणीही हजर झाले नसल्याने न्यायालयाने या तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरेंट जारी केले आहे.