Chinchwad

नगरसेविका उषा मुंढे यांच्या वतीने पिंपळेगुरवमध्ये आयोजित इफ्तार पार्टी उत्साहात

By PCB Author

May 31, 2019

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक २९, पिंपळेगुरव-सुदर्शननगरच्या भाजप नगरसेविका उषा मुंढे यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त प्रभागातील मुस्लिम महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम महिलांना फळांचे वाटप करून इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न झाली.

मुस्लिम धर्मात रमजान महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास (रोजे) करतात. धर्म परंपरेनुसार या महिन्यात रोज सायंकाळी उपवास  सोडला जातो. या महिन्यात रोजे धारकांना इफ्तार पार्टी देणे पुण्याचे काम समजले जाते. त्यानुसार हिंदू-मुस्लिम ऐक्य साधण्याच्या उद्देशाने पिंपळेगुरव-सुदर्शननगरच्या भाजप नगरसेविका उषा मुंढे यांनी प्रभागातील मुस्लिम महिलांसाठी गुरूवारी (दि. ३०) सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

पिंपळेगुरवमधील सुदर्शननगरमध्ये इफ्तार पार्टी उत्साहात झाली. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तसेच माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील सर्व मुस्लिम भगिनींना फलाहाराचे वाटप केले. यावेळी प्रभागातील मुस्लिम महिला व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपवास सोडण्यापूर्वी मुस्लिम महिलांनी समाजात सुख, समाधान व शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली.

नगरसेविका उषा मुंढे म्हणाल्या, “शहराचे नेते व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या यशात शहरातील मुस्लिम समाजाचा सिंहाचा वाटा आहे. हा समाज नेहमीच आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. या समाजाच्या उन्नती आणि प्रगतीसाठी आमदार जगताप यांच्याकडून सातत्याने प्रयत्न होत असतात. या समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार जगताप व आम्ही कायम कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.”