नगरसेवक राहुल कलाटे कोरोना बाधित

542

 

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) -सतत लोकांच्या संपर्कात असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राजकीय नेते आणि अधिकारी आता कोरोनाच्या जाळ्यात येत चालले आहेत. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे  यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सोमवारी रात्री त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंत सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तालाही आज कोरोनाची लागण झाली आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाने लोकप्रतिनिधी, महापालिका कर्मचा-यांनाही विळखा घातला आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना मोठी मदत केली होती. जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. तसेच महापालिकेतील विविध बैठकांना देखील ते हजर राहत असत. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यांच्या दोन मित्रांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वतूःहून त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट  पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तालाही आज कोरोनाची लागण झाली आहे.

यापूर्वी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे, शैलेश मोरे,  चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्राधिकरणातील नगरसेविका शैलजा मोरे यांचे चिरंजीव व माथाडी बोर्डाचे माजी सदस्य अमुप मोरे हेसुध्दा कोरोना बाधित निघाले.  दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना आणि च-होलीतील राष्ट्रवादीच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  तर, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी (दि.4) निधन झाले आहे.