नगरसेवक तुषार कामठे यांच्या कार्यालयात तक्रार केल्याने कार्यकर्त्यांकडून कुटूंबाला सोसायटीत घुसून मारहाण

2668

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – सनासुदीच्या काळात रहिवासी सोसायटीमध्ये पाणी कमी दाबाने येत असल्याची तक्रार घेऊन नगरसेवकाच्या कार्यालयात केल्याने कार्यकर्त्यांनी तक्रारदार इसमासह त्यांच्या कुटूंबीयांना सोसायटीत घुसून जबर मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.१८) रात्री साडेआठच्या सुमारास पिंपळे निलख येथील धीरज गोल्ड अपार्टमेंटमध्ये घडली.

संतोष दोडके (वय ४३, रा. धीरज गोल्ड अपार्टमेंट, पिंपळे निलख, सांगवी) त्यांचा मुलगा प्रणिकेत (वय १९) असे जखमी पीता-पुत्राचे नाव आहेत. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल कामटे, विशाल कामटे, प्रतीक दळवी आणि गणेश नावाच्या इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी फिर्यादी हे राहत असलेल्या धीरज गोल्ड अपार्टमेंट सोसायटीमध्ये कमी दाबाने पाणी सुरु होते. दसरा असल्यामुळे सोसाटीच्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे संतापलेले संतोष हे त्यांची तक्रार घेऊन त्यांच्या भागातील नगरसेवक तुषार कामठे यांच्या विनायकनगर पिंपळे निलख येथील कार्यालयात मदतीच्या आशेने गेले.  त्यांनी त्यांची तक्रार कार्यालयात उपस्थित असलेल्या अमोल कामटे यांच्याकडे केली आणि घरी निघून आले. रात्री साठेआठच्या सुमारास संतोष हे घरी जेवण करत असताना नगरसेवक तुषार कामठे यांचा ड्रायवर गणेश याने संतोष यांना घराखालील पार्किंगमध्ये बोलवले. त्या ठिकाणी आगोदरच अमोल कामटे, विशाल कामटे आणि आणखी काही अनोळखी लोक होते. त्यांनी मिळून संतोष, त्यांचा मुलगा प्रणिकेत यांना जबरमारहाण करत त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की केली. हल्लेखोरांनी प्राणिकेत याला तीन ते चार दिवसात ठार करण्याची धमकी देखील दिली आहे. याप्रकरणी अमोल कामटे, विशाल कामटे, प्रतीक दळवी आणि गणेश या सर्वांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, सोसायटीतील सीसीटीव्ही तपासून आरोपींना अटक करणार असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिली आहे.