नगरसवक जावेद शेख कोरोना पॉझिटिव्ह

0
436

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील जे लोकप्रतिनिधी सतत नागरिकांच्या संपर्कात असतात त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसते. आकुर्डी- मोहननगर प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  भोसरी मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यासह आजवर नऊ नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली. जावेद शेख हे स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आजवर कोरोना झालेल्या सर्व नगरसेवकांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. पूर्वीपासून मधुमेह, रक्तदाबाचा आजार असल्याने माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आजार बळावत गेला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

नगरसेवक जावेद शेख म्हणाले, माझ्या घरातील तीनजणांना कोरोना झाला होता. वायसीएम मध्ये त्यांनी उपचार घेतले आणि बरे होऊन घरी आले. लोकांच्या सतत संपर्कात असल्याने तसेच घरात रुग्ण असल्याने मलाही बाधा झाली. आठव्यापूर्वी ताप, थंडीचा त्रास होत होता. व्हायरल असेल असे डॉक्टरांनी सांगितले, पण तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह आला. महापालिकेचे डॉक्टर मनोज लाठी, डॉ. हरिष शेंडे, सावरे मॅडम यांनी खूप सहकार्य केले म्हणून लवकर बरा झालो. माझ्या पाहण्यात आले की ८०-९० टक्के लोक कोरोनावर मात करून बरे होतात. त्यामुळे कोरोना झाला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे ते म्हणाले.