नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी चौंडीत अतिक्रमण करून बांधला ६ कोटींचा बंगला; पंतप्रधान मोदींकडे वकिलाची तक्रार

0
730

अहमदनगर, दि. ३१ (पीसीबी) – नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) येथे सुमारे सहा कोटी रुपये खर्चून बांधलेला आलिशान बंगला दक्षिण व पूर्व बाजूला रस्त्यात अतिक्रमण करून बांधला असल्याचा दावा कर्जत येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. कैलास शेवाळे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जिल्हा प्रशासनाकडेही तक्रार केली आहे. महिनाभरात जिल्हा प्रशासनाने या अतिक्रमणावर कारवाई केली नाही, तर न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही अॅड. शेवाळे यांनी दिला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेले चौंडी गाव शिंदे यांचेही जन्मगाव आहे व ते अहिल्यादेवींचे वंशज मानले जातात. अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (३१ मे) चौंडीत अभिवादन कार्यक्रम होणार असून, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, छत्रपती संभाजी महाराज आदींसह मान्यवर चौंडीत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अॅड. शेवाळे यांनी शिंदे यांच्या बंगल्याच्या अतिक्रमणाची तक्रार करून खळबळ उडवून दिली आहे.

वडिलांच्या नावावर बंगला

‘चौंडी येथील अविनाश शिंदे यांच्याकडून राम शिंदे यांचे वडील शंकर शिंदे यांनी ३२ गुंठे जमीन खरेदी केली असून, त्यापैकी फक्त २५ गुंठे जमिनीचेच खरेदीखत केले आहे. जामखेडच्या तहसीलदारांनी या जमिनीचे अकृषक जमिनीत (एनए) रुपांतर केले आहे,’ असे सांगून शेवाळे म्हणाले, ‘शंकर शिंदे यांच्या नावावर हा बंगला बांधण्यात आला असून, तेथे प्रा. शिंदे राहतात. हा बंगला चौंडी ते अरणगाव व चौंडी ते देवकरवस्ती रस्त्यांवर आहे. बंगल्याच्या दक्षिण बाजूस १५ मीटर अतिक्रमण असून, तेथे खोल्या बांधण्यात आल्या आहेत व पूर्व बाजूसही १२ मीटर अतिक्रमण करून कंपाउड वॉल बांधली गेली आहे. यामुळे चौंडीचा रस्ताही काहीसा तिरकस झाला आहे.’ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियमानुसार रस्त्याच्या मध्यापासून १२ ते १५ मीटर अंतर सोडून बांधकाम करण्यात यावे, अशी अट बिगरशेती परवाना देताना तहसीलदारांनी टाकली असताना तिचा कोणताही विचार न करता वाढीव बांधकाम केल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

शंकर शिंदे यांच्या नावावर अडीच एकर व त्यांचा मुलगा पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या नावावर दोन एकर जमीन असताना व प्रा. शिंदे यांना आमदारकी मानधनाव्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे साधन नसताना त्यांनी ६ कोटींचा बंगला बांधला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणूक शपथपत्रात प्रा. शिंदेंनी पाच लाख ८६ हजार व २०१४ च्या निवडणुकीत ५६ लाख १६ हजाराची स्वतःची संपत्ती दाखवली असताना बंगल्यासाठी एवढे पैसे कोठून आले, याची चौकशी करण्याची मागणी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) करणार असल्याचेही अॅड. शेवाळे यांनी सांगितले.

‘प्रा.’ उपाधी कसली?

‘प्रा. राम शिंदे यांचे खरे नाव रामदास शिंदे असून, त्यांनी ‘रामदास’ऐवजी ‘राम’ नाव लावणे सुरू केले आहे. सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण न होता वा पीएचडी न मिळवता ते स्वतःपुढे ‘प्रा.’ अशी उपाधी लावतात, त्यांचे शिक्षण एम.ए. बी.एड आहे, त्यामुळे त्यांनी नावात व पदवीतही खोटेपणा केला आहे,’ असाही दावा अॅड. शेवाळे यांनी केला.